शिरसाटही गड राखणार
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. या शिरसाट यांच्या मतदारसंघातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या एकूण ६ वॉर्डमध्ये १७ सदस्यांसाठी निवडणूक झाली असून सध्या मतमोजणी सुरू आहे. यातील पहिल्या वॉर्डात ३ पैकी ३ उमेदवार आणि दुसऱ्या वॉर्डात देखील २ पैकी २ उमेदवार विजयी करण्यात शिरसाट गटाला यश आलं आहे. अन्य वॉर्डांमध्ये अद्याप मतमोजणी सुरू आहे.
सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे गटाला दिलासा
सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी शिवसेनेच्या ७ पैकी ७ उमेदवारांचा विजय झाला आहे, तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीमध्येही भाजपच्या सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. मनगोळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सुभाष देशमुख गटाची सत्ता होती. मात्र, यंदा मनगोळी ग्रामपंचायतीमध्ये सहापैकी केवळ एका जागेवरच सुभाष देशमुख पॅनलचा उमेदवार विजयी झाला.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका खरंतर पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. या निवडणुकीत स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. मात्र ग्रामपंचायतींच्या पातळीवर निर्माण झालेली राजकीय ताकद पुढे जाऊन विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रयत्नशील असतात.