शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर शरद पवार हे राऊत कुटुंबीयांच्या भेटीला जाऊ शकतात. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही उपस्थित असतील, असे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, शरद पवार हे राऊत कुटुंबीयाला भेटायला गेल्यास हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरेल. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राऊत कुटुंबीय एकाकी पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतल्यास हा त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा ठरेल. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार आजच भांडूपमधील मैत्री बंगल्यावर राऊत कुटुंबीयांच्या भेटीला जाऊ शकतात. या भेटीची संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मैत्री बंगल्यावर जाऊन संजय राऊत यांची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेतली होती. या माध्यमातून शिवसेना राऊत यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याचा संदेश देण्यात आला होता.
राऊतांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मौन
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शरद पवार हे मौन बाळगून आहेत. केवळ एक मोघम प्रतिक्रिया देण्यापलीकडे शरद पवार याविषयी फार काही बोलले नाहीत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) जवळचे मानल्या जाणाऱ्या राऊतांवर ईडीने इतकी मोठी कारवाई केल्यावरही ते गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जाहीरपणे संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध केला होता. मात्र, शरद पवार शांत असल्याने त्यांच्या मौनाचा नेमका अर्थ काय, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
शरद पवारांच्या (Sharad Pawar) जवळचे मानल्या जाणाऱ्या राऊतांवर ईडीने इतकी मोठी कारवाई केल्यावरही ते गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे. संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यापासून राष्ट्रवादीकडून ना शरद पवार, ना विरोधीपक्ष नेते अजित पवार, ना जयंत पाटील कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी संजय राऊत यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आक्रमकपणे केंद्रीय तपासयंत्रणावर टीका केली होती. मात्र, आता संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यापासून अंतर राखून का आहे, असा सवाल विचारला जात आहे.