२४ वर्षीय नूह दस्तगीरने स्नॅचमध्ये १७३, क्लीन आणि जर्कमध्ये २३२ आणि तीन खेळांचे रेकॉर्ड मोडीत काढले. “आम्ही मीराबाईकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतो. तिने आम्हाला दाखवून दिले आहे की, दक्षिण आशियाई देशांचे खेळाडूदेखील ऑलिम्पिक पदक जिंकू शकतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकले तेव्हा आम्हाला तिचा खूप अभिमान वाटला.”
गुरदीप सिंहने त्याच गटामध्ये कांस्यपदक जिंकले आहे आणि पाकिस्तानी खेळाडू बट हा गुरदीपला आपला सर्वात जवळचा मित्र मानतो. “गेल्या सात आठ वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही काही वेळा परदेशात एकत्र प्रशिक्षण घेतले आहे. आम्ही दोघे नेहमीच संपर्कात असतो.” असे बटने भारतीय खेळाडूबद्दल सांगितले. बटसाठी, ही भारत वि. पाकिस्तान अशी लढाई कधीच नव्हती, तर त्याच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. “मी भारताच्या लिफ्टरशी स्पर्धा करत होतो असे नाही. मला फक्त माझे सर्वोत्तम द्यायचे होते आणि जिंकायचे होते,” असं तो गुरदीपबद्दल म्हणाला.
भारताला दोनदा दिलेली भेट आणि आयुष्यभराच्या आठवणी
बट आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी दोन वेळा भारतात आला आहे. प्रथम म्हणजे २०१५ मध्ये पुण्यात युथ कॉमनवेल्थ चॅम्पियनसाठी आणि लगेच पुढच्या वर्षी गुवाहाटीमधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा होती. “मी भारतात दोन वेळा आलो आहे आणि प्रत्येक वेळी मला मिळालेला पाठिंबा अविस्मरणीय होता. मला भारतात पुन्हा जाण्याची इच्छा आहे.” असं ही तो पुढे म्हणाला. “मला वाटतं, पाकिस्तानपेक्षा माझे जास्त चाहते भारतात आहेत.” असं पुढे तो मस्करीत म्हणाला.
शेजारील देशांमधील सीमापार तणावादरम्यान, एक पाकिस्तानी गट २०१६ मध्ये गुवाहाटी – शिलाँग येथे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आला होती. “फक्त “स्वतःला घरी असल्याचे अनुभवण्यासाठी” पण जेव्हा मी गुवाहाटीमध्ये होतो तेव्हा तेथील हॉटेलमधील कर्मचारी माझ्यासाठी एक कुटुंब झाले होते आणि जेव्हा मी निघालो तेव्हा त्यांना अश्रु अनावर झाले होते. इतके खोलवर आणि चांगले संबंध त्या १०-१५ दिवसात प्रस्थापित झाले होते. त्यांनी मला असं कधीच जाणवू दिलं नाही की मी पाकिस्तानवरून आलोय किंवा त्यांचा शत्रू आहे.” आता या चॅम्पियनशिपला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. “निश्चितच मी पुन्हा भेट देण्यास उत्सुक आहे. मी भारतात जसा आनंद लुटला तसा मी इतर कोणत्याच स्पर्धेला लुटला नाही.” असं ही तो पुढे म्हणाला.
प्रशिक्षक वडील गुलाम यांच्या तालमीत प्रशिक्षण
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील पाकिस्तानचे हे एकमेव दुसरे सुवर्णपदक आहे. शुजा-उद्दीन मलिक (८५ किलो) हा सुवर्ण पदक (मेलबर्न २००६) जिंकणारा देशातील एकमेव लिफ्टर होता. कांस्यपदक जिंकणारा ज्युडोका शाह हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पोडियमवरील एकमेव पाकिस्तानी खेळाडू होता. त्याचे वडील सह प्रशिक्षक गुलाम दस्तगीर हे माजी राष्ट्रीय चॅम्पियन आणि SAF खेळातील पदक विजेते होते. त्यांनी आपल्या मुलासाठी त्यांच्या गुजरानवाला घरी एक व्यायामशाळा बांधली आहे, तिथे तो तासनतास सराव करतो.
“आमच्या अनेक सहकारी खेळाडूंना जिंकता आले नाही. त्यामुळे माझ्याकडून सर्वांनाच फार अपेक्षा होत्या. माझ्या देशाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील पहिले सुवर्ण पदक मिळवून देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती .” बट म्हणाला, “मी २०१८ नंतर काही दुखापतींसोबत संघर्ष करत होतो त्यामुळे मी टोकियो स्पर्धेत जिंकू शकलो नाही. यासाठी मी गेली दोन-तीन वर्ष माझ्या अब्बू (वडील) सोबत खूप काम केले आणि पुनरागमन केले. “माझे बाबा माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्याच्या काळात ते सर्वोत्तम वेटलिफ्टर होते. हे पदक त्यांचेच आहे.”