मुंबई : भारताच्या सुधीरने गुरुवारी मध्य रात्री सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुधीरने पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी यश मिळवले. या यशानंतर सुधीरचे महाराष्ट्राच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले आहे. पण हे कौतुक करत असताना सुप्रिया ताईंनी जे शब्द वापरले आहेत, ते नक्कीच वाचण्यासारखे आहेत.

वाचा-गोल्ड मेडल… भारताच्या सुधीरने रचला इतिहास, सुवर्णपदकासह केला मोठा विक्रम

आशियाई पॅरा गेम्समध्ये सुधीरने कांस्यपदक पटकावले होते. पण यावेळी मात्र सुधीरने भारतीयांना सोनेरी भेट दिली. या स्पर्धेत सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

वाचा-भारत आणि वेस्ट इंडिजचे सामने अमेरिकेत का खेळवणार, जाणून घ्या यामागचं खरं कारण…

सुधीरचे कौतुक करताना सुप्रिया ताई म्हणाल्या की, ” अभिनंदन सुधीर ! बर्मिंगहॅम येथे सुरु असणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुधीरने २१२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.पॅरा वेटलिफ्टींग स्पर्धेत सुधीरने मिळविलेले हे यश अतिशय प्रेरणादायी आहे. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला तुझा अभिमान वाटतो.”

ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही गुरुवारी मध्य रात्री जवळपास साडे तीन वाजता झाली. पण एवढ्या रात्री जरी ही स्पर्धा झाली असली तरी सुप्रिया मात्र त्याचे कौतुक करायला विसरल्या नाहीत. सुप्रिया ताईंनी यावेळी सुधीरचे कौतुक करताना हे यश प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असेही म्हटले आहे.

पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुधीरने भारतासाठी पॅरा स्पोर्ट्समध्ये पदकाचे खाते उघडले. पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात प्रथम आल्यावर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताचे सहावे सुवर्ण जिंकले. त्याने १३४.५ गुण मिळवले आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत अव्वल क्रमांक आपल्याकडेच ठेवला. त्याचबरोबर सुधीरने नवीन खेळ विक्रम प्रस्थापित केला. या विजयासह भारताची सहा सुवर्णपदके झाली असून ते पदकतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले जे त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेसे होते. नायजेरियाच्या ख्रिश्चन ओबिचुकवू आणि स्कॉटलंडच्या मिकी युलने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here