‘अलिबाबा आणि चाळीस चोर’
बंडखोर आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र ही टीका करताना या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे असल्याचंही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र आता हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं सांगत शिवसेनेनं बंडखोरांवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.
‘गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या ‘डायरिया’मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या ‘चाळीस’ जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
‘उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर वातावरण बदलणार’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून उद्धव यांच्या या दौऱ्यानंतर राज्यातील संपूर्ण वातावरणच बदलून जाईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. ‘शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल,’ असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.