भाजपसह बंडखोर गटावर हल्लाबोल
आदित्य ठाकरे यांनी काल शुक्रवारी गांधी मार्केट तसंच हिंदमाता येथील अंडरग्राऊंड वॉटर टॅंकशी संबंधित कामांची पाहणी केली. यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील आदित्य ठाकरे यांनी दिल्या. दरम्यान, माध्यमांशी बोलताना विरोधक करत असलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणि ते राजकारणात व्यस्त आहेत, असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘गांधी मार्केटला गेलो, अनेक वर्षे हिंदमाता येथे मीडिया यायचा, आम्ही यायचो, कधी कधी छातीपर्यंत पाणी भरलेलं असायचं, गुडघ्यापर्यंत पाणी असायचं. तेव्हा प्रश्न विचारला जायचा की हे किती दिवस चालणार. सतत कारणं देऊन चालणार नाही, यावर तोडगा काढणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी गांधी मार्केटच्या इथे पंप लावण्यात आले. हिंदमाता येथे सेंट झेविअर्सचं मैदान होतं तिथे दोन मोठे अंडर होल्डिंग टँक केले. प्रत्येक महिन्यात येऊन याचा पाठपुरावा केलेला आहे. यावेळी येण्याची गरज भासली नाही, कारण पाणीच तुंबलं नाही. या गोष्टीचा आनंदही आहे.’
दीपक केसरकर यांच्याबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा आहे. ‘तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न ते करत आहे. मात्र त्यांनी एवढी कारणं दिली आहेत ना की मी शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यत यांचं कारण बदललेले असतं. कोणालाही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा,’ असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे.