chandrapur news updates, अशुद्ध पाण्यामुळे गावात उडाला हाहाकार; अतिसाराची लागण होऊन तिघांचा मृत्यू – three people from devala village in rajura taluka died due to diarrhoea
चंद्रपूर : ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ हे घोषवाक्य गावागावातील भिंतींवर दिसतं. मात्र असा भारत उभा करण्यात आपल्या व्यवस्थेला यश आलं आहे का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावातही असाच काहीसा प्रकार घडला असून अतिसारामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राजूरा विधानसभा क्षेत्रात येणारे देवाळा या गावातील गावकरी सध्या धास्तावले आहेत. गावात अतिसाराची लागण सुरू आहे. घराघरात रूग्ण आढळत आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांनी पूर्णपणे भरलं असून अतिसाराची लागण झाल्याने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तसंच ९० पेक्षा अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गावात नळयोजनेद्वारे होणारा दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. गावातील नळयोजनेचे व्हॉल्व्ह खड्ड्यात आहेत. त्याठिकाणी सांडपाणी जमा झाले आणि तेच पाणी नळामार्फत नागरिकांना पुरवले जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक! पत्नीची हत्या करून माथेफिरु पतीनं उचललं टोकाचं पाऊल; परिसरात खळबळ
गावातील नाल्यांची साफसफाई झालेली नाही. फवारणीसुद्धा नियमित केली गेली नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अतिसाराची लागण होऊन अनिशा शेख (वय २५), सोमा शेंडे (वय ५५ ) आणि लक्ष्मी मंचकटलावार (वय ५०) या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. स्वच्छ भारत असं केवळ भिंतीवर लिहिल्यानं गाव स्वच्छ होणार नाही. प्रशासन आणि गावकऱ्यांचा सहभागातून गावे स्वच्छ होतील. मात्र जिथं प्रशासनच हात आखडता घेत आहे तिथे आम्ही तरी काय करणार, अशा शब्दांत गावकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, देवाळा गावातील अतिसाराची लागण आटोक्यात आणून बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.