औरंगाबाद : बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झालेले शिवसेनेचे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दणका दिला आहे. जैस्वाल यांची उद्धव ठाकरेंनी महानगरप्रमुख या पदावरून हकालपट्टी करत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेत बंड पुकारत पक्षाचे ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यामध्ये औरंगाबाद मध्यचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जैस्वाल यांची पदावरून उचलबांगडी केली आहे.

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्ताराचा खलिता घेऊन येणार?

किशनचंद तनवाणी आणि शिवसेना

शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी २०१९ ला शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर भाजपमध्ये मन न रमल्याने ते पुन्हा स्वगृही परतले आणि त्यांनी पुन्हा शिवबंधन बांधले. मात्र दोन वर्ष उलटल्यानंतरही त्यांच्या पदरात कुठलेही पद नव्हतं. त्यामुळे अलीकडच्या काळात तनवाणी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ‘साहेब आता निर्णय घ्या’ अशी बॅनरबाजी संपूर्ण शहरात केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांप्रमाणेच तनवाणी देखील शिंदे गटात जातात की काय? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडून महानगरप्रमुखपदाची जबाबदारी तनवाणी यांच्याकडे दिली आहे.

तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? चर्चेवर आदित्य यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनवाणी यांना पक्षात महत्त्वाचे पद दिल्याने येत्या काळात बंडखोर आमदारांचा गट आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कारण तनवाणी यांच्या पाठीमागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादमध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here