Abdul sattar news, शिंदे सरकार अब्दुल सत्तारांवर मेहरबान; नियमांना अपवाद करत कोट्यवधींचा निधी – eknath shinde govt grants shivsena rebel mla abdul sattar’s mill an exception important information updates
मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याची सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची. आमदार सत्तार यांच्या मालकीच्या सूतगिरणीला शिंदे सरकारने १५ कोटी १७ लाख ३० हजार रुपयांचा निधी शासकीय भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अब्दुल सत्तार यांची सूतगिरणी ज्या तालुक्यात आहे तो सिल्लोड तालुका खरंतर अशा प्रकारच्या मदतीसाठी पात्र नाही. मात्र राज्य सरकारने नियमांमध्ये अपवाद करत हा निधी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. कापड उद्योगासंदर्भातील धोरणानुसार ज्या तालुक्यांमध्ये मानवी विकास निर्देशांक कमी आहे, अशा तालुक्यांतील सूतगिरण्यांना आर्थिक मदत केली जाऊ शकते. मात्र सिल्लोड तालुका या निकषामध्ये बसत नाही. असं असतानाही सत्तार यांनी सरकार दरबारी आपलं वजन वापरून हा निधी मंजूर करून घेतल्याची चर्चा आहे. तसंच शासनाच्या निर्णयानंतर जेमतेम नऊ दिवसांमध्ये हा निधी वितरीत झाला आहे. Varsha Raut : वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात, उजवा हात गळ्यात, नेमकं झालंय काय?
अब्दुल सत्तार आणि शिवसेनेतील बंड
कधीकाळी काँग्रेसचे मराठवाड्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेताच अब्दुल सत्तार यांनी लगेच शिंदे यांचे हात बळकट करत त्यांच्या गटात प्रवेश केला.
नेमका काय आहे निर्णय?
राज्य सरकारच्या सहकार विभागातर्फे सिल्लोडच्या राष्ट्रीय सहकारी सूतगिरणीला ८०.९० कोटी रुपयांचे अर्थसाह्य दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गिरणीची ५:४५:५० या आकृतीबंधानुसार अर्थसाह्यासाठी निवड करण्याचा निर्णय ७ जुलैला घेण्यात आला होता. गिरणीने ३१ मार्च २०२१ अखेर ३८८.१८ लाख इतके सभासद भागभांडवल जमा केले होते. त्यानंतर सूतगिरणीसाठी मंजूर शासकीय भागभांडवलाचा पहिला टप्पा देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्याचा निर्णय सहकार विभागाने मंजूर केला.
राजकीय चर्चेला उधाण
शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर यांच्या मालकीची ही सूतगिरणी आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिंदे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळणारे सत्तार पहिले आमदार ठरले होते. या निर्णयामुळे सत्तार यांचे नव्या सरकारमधील राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू असून त्यांना मंत्रिपदाचीही लॉटरी लागू शकते.