गोष्ट हा तसा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग. प्रत्येकाकडे स्वत:ची अशी गोष्ट असतेच. काही गोष्टी सांगितल्या जातात, तर काही गोष्टी न सांगताच खूप काही सांगून जातात. दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा सिनेमाही अशीच एका ध्येयवेड्या गोष्ट सांगणाऱ्याची गोष्ट सांगतो.

रूढ वाटांवरून न जाता गोष्टीतून प्रबोधन करू इच्छिणाऱ्या आणि मुलांना नवा विचार देणाऱ्या किरण या शिक्षकाची ही गोष्ट आहे. व्यावसायिक गणिते डोळ्यांपुढे न ठेवता आशयाशी आणि कथेशी प्रामाणिक राहून केलेला हा सिनेमा मानवी संबंधांचा संवेदनशील आविष्कार आहे. एक मुलगा आणि त्याचा बाप यांच्यातील बंध उलगडणारा हा सिनेमा कौटुंबिक असला तरीही त्यातील एक वेदना त्यातून पुढे येत असल्यामुळे तो कळत्या वयातील मुलांसह पाहावा असा आहे.

वडिलांचा प्रकाशन व्यवसाय बंद करून शिक्षणात वेगळे प्रयोग करणारी शाळा सुरू करणारा किरण () आणि त्याचा मुलगा चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) यांची ही गोष्ट आहे. किरणची पत्नी श्रुती (), आई-वडील (सुहास जोशी-डॉ. मोहन आगाशे) असं हे कुटुंब आहे.

एक वेगळे प्रयोग करणारी शाळा असणाऱ्या ‘नंदनवन’मध्ये टिपिकल मध्यमवर्गीय मुलं शिकत आहेत, तसाच अगदी रस्त्यावर सिग्नलला भीक मागणारा मुलगाही शिकत आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मुलांसाठी एक गोष्ट नाट्य स्वरूपात सादर करण्यासाठी किरणची धडपड सुरू आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी स्वत:चं हक्काचं असं अॅम्फी थिएटर हवं, असं त्याचं स्वप्न आहे. त्यासाठी त्याला जागाही मिळते. त्यासाठीचे सर्व सरकारी सोपस्कारही पार पडतात. एका सुखी, समाधानी कुटुंबात मिठाचा खडा पडावा, तसा प्रकार घडतो. एक घटना घडते आणि या सर्वांचं आयुष्यच बदलून जातं.

बाबांना एक ‘आयडॉल’ म्हणून पाहणारा चिंतन सर्व गोष्टी बाबांसारख्या करण्याच्या प्रयत्नात आहे. चिंतन आणि त्याचा बाबा यांचं हे भावस्पर्शी जग या दोघांचं असं आहे. या जगाला तडा जाणाऱ्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते. मग पुढं या गोष्टीत काय होतं? किरणचं अॅम्फी थिएटरचं स्वप्न पूर्ण होतं का? या गोष्टीतून चिंतन काय शिकतो? या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी ‘एकदा काय झालं…’ पाहायला हवा.

वेगळं काही करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य उलगडत असताना गोष्टीमध्ये किरण सुरुवातीपासून का रमायला लागला, त्याच्या खोलात लेखक-दिग्दर्शक जात नाही. मानसिक अस्वस्थतेतून जाणाऱ्या व्यक्तिरेखांची गोष्ट मांडत असताना त्याचं लेखन अतिशय संवेदनशील पद्धतीनं करावं लागतं. छोट्या छोट्या प्रसंगातही सिनेमाच्या आशय-विषयाला कोठेही धक्का लागणार नाही, अशी मांडणी करावी लागते.

लेखकाने ती अतिशय प्रामाणिकपणे केल्याचं आपल्याला जाणवतं. मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी हलकाफुलका आणि सरळ असलेला सिनेमा मध्यंतरानंतर मात्र कमालीचा गंभीर होतो. किरण-चिंतनच्या गोष्टीचा नकळत आपणही एक भाग होऊन जातो. मुळात गोष्ट ऐकायला कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर या गोष्टी आकर्षित करताच. त्यामुळे या गोष्टीतही पुढे काय होतं, याची उत्सुकता फार राहत नसली तरीही वेदनेची किनार असलेल्या या गोष्टीचा शेवट काय होणार, याबाबत उत्सुकता लागते. व्यावसायिक शरणागती न पत्करता हा शेवट वास्तववादी होईल, याची पुरेपूर काळजी लेखक-दिग्दर्शक घेतो. या कुटुंबातील पंचकोनात चिंतनची आई आणि ओघानेच किरणची पत्नी असणारी श्रुती काहीशी बाजूलाच पडते. तिलाही खूप काही सांगायचं आहे, तिचीही स्वत:ची अशी काही कैफियत आहे, असं वाटत राहतं. काही प्रसंगात तिचं हे मन मोकळं होतंही. मात्र, तो ट्रॅक काहीसा अधुराच राहतो. अर्थात मुख्य फोकस बाप-लेकावर असल्यामुळे असं झालं असावं.

अभिनयात सर्वांनीच कमाल केली आहे. सुमीतचा ध्येयवेडा शिक्षक नक्कीच लक्षात राहावा, असा आहे. चिंतनचे काम करणाऱ्या अर्जुन पूर्णपात्रेनेही कमाल केली आहे. खासकरून क्लायमॅक्समधला त्याचा अभिनय लक्षात राहणारा. उर्मिला तिच्या वाट्याला आलेली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे करते. , सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. छोट्याशा भूमिकेत मुक्ता बर्वेही लक्षात राहते. मारुती स्तोत्र, अंगाईपासून ते शंकर महादेवनच्या ‘रे क्षणा…’पर्यंत गाणी श्रवणीय झाली आहेत. संवेदनशील स्वरूपाचे सिनेमे आवडणाऱ्यांनी हा सिनेमा चुकवू नये असा आहे.

सिनेमा : एकदा काय झालं

निर्माते : पुणे टॉकिज प्रा. लि., हेमंत गुजराथी, चिराग गुजराथी

लेखन-पटकथा-संवाद-संगीत-दिग्दर्शन : डॉ. सलील कुलकर्णी

गीतकार : संदीप खरे, समीर सामंत

छायांकन : संदीप यादव

कलाकार : सुमीत राघवन, उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपात्रे

दर्जा : साडे तीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here