पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा लाऊडस्पीकरबाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिस्तीने वागायचे. मात्र आता वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कायदे करणारे राज्यकर्तेच जर नियम मोडत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, असंही बोलणारा एक वर्ग असतो. त्यामुळे सर्वांनी कायद्याचं पालन करावं,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘सरकारकडून जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करा, असं सांगत आहोत. मात्र लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अधिकार नाहीत. याबाबत शिंदेंनी उत्तर द्यायला हवं. दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबवल्याचं आता समोर येत आहे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी कमालच केली! थेट ‘उद्धव ठाकरे गट’ करुन टाकलं

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीची काही दिवसांपूर्वी पुण्यात तोडफोड करण्यात आली होती. याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, ‘या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज असून हल्ल्यामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. हा भ्याड प्रकार आहे. हल्ला करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीचेही असतील तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,’ असं अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here