‘मी अतिशय दु:खी आहे. आठ वर्षे झाली. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. मला दररोज मारहाण व्हायची. तो कधीतरी सुधारेल, या आशेनं मी आठ वर्षे सगळं सहन करत होते. पण काहीच फारक पडला नाही. लग्नानंतर झालेली मारहाण आतापर्यंत सुरुच आहे. त्याचे विवाहबाह्य संबंधदेखील होते. लग्नानंतर सुरुवातीची अडीच वर्षे आम्ही भारतात राहिलो,’ अशा शब्दांत मनदीप कौर यांनी त्यांची व्यथा मांडली. मनदीप यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
‘अडीच वर्षानंतर आम्ही न्यूयॉर्कला आलो. दारू पिऊन तो मला मारहाण करायचा. कधीकधी दारू न पिताही मारायचा. त्याचे इतर महिलांसोबत संबंधदेखील होते. माझ्या वडिलांनी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर तो माझ्याकडे गयावया करू लागला. मला वाचव, मला वाचव अशा शब्दांत त्यानं माझ्याकडे याचना केली. सगळं काही सुरळीत व्हावं यासाठी मी त्याला वाचवलं. मात्र माझ्या सासू, सासऱ्यांनी मला कोणतीच मदत केली नाही,’ असं म्हणत मनदीप त्यांनी भोगलेल्या यातना शब्दांत मांडल्या.
मी काहीच बोलणार नाही. देव सगळ्यांना शिक्षा करेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला त्रास दिला. त्यामुळे माझ्या मुलांना सोडून मला जावं लागत आहे, असं मनदीप यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये मनदीप यांचा पती त्यांना बेडवर ढकलताना दिसत आहे. मनदीप यांच्या दोन मुली वडिलांना आईला नका मारू अशी विनवणी करत रडत आहेत.