
कुत्री फस्त करणारा बिबट्या कोंबडीच्या वासाने थेट घरातच शिरला
रत्नागिरी :
राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात बिबट्याची चांगलीच दहशतच पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास एक थरारक प्रसंग घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील कोंबडयांच्या वासाने चक्क गावातील एका घरातच बिबट्याने प्रवेश केला. इतक्यात घरातील महिलेने बिबट्याला पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर प्रसंगावधान राखत घरातील सर्वांनी स्वत:ला एका खोलीत सुरक्षितपणे बंद करून घेतले.खोलीला आतून कडी लावली. त्यानंतर सर्वांनी आरडाओरड केला. गोंधळ ऐकून बिबट्या आल्या पावली परत गेला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (an atmosphere of fear has spread in the area after a leopard entered the house)
परिसरात पसरली घबराट
या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गोठणे-दोनवडे हातणकरवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. चक्क भर दिवसाही ग्रामस्थांना याचे दर्शन होत आहे. वाडीतील काही कुत्रीही या बिबट्याने फस्त केली आहेत.
गुरुवारी संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान हा बिबट्या दीपक साखरकर यांच्या घराच्या पडवीतील कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला होता. साखरकर कुटुंबीयांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थ महेश नकाशे यांनी लागलीच राजापूर तहसीलदार यांना या घटनेची माहिती दिली. तहसीलदार शितल जाव, निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी तत्काळ रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी आपल्या टीमसह या ठिकाणी पोहोचले व पाहणी केली. गोठणे- दोनिवडे सरपंच मुकेश विचारे, माजी सरपंच अशोक साखरकर यांनी साखरकर कुटुंबियांची भेट घेतली. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.