शुक्रवारी, ०५ ऑगस्ट रोजी गुहागर तालुक्यातील अरमारकर मोहल्ला, अंजनवेल येथील राहणारी गजाला फैयाज महालदार यांच्या ३ अल्पवयीन मुलींना (प्रत्येकी वय १७ वर्षे, १३ वर्षे, ११ वर्षे) मोहल्यात राहणाऱ्या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी यांनी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आम्ही अंजनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर गजाला यांच्या ३ मुलींना सोबत घेवून त्या गेल्या. मात्र तिनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात इतरत्र शोध घेतला गेला.
तसेच डॉक्टरांकडेही चौकशी केली. तेव्हा महिला व मुली हॉस्पीटलमध्ये गेल्या नसल्याचे समजले. गजाला महालदार यांनी रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहून आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने त्या दोन्ही महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यावेळी ३ मुलींसोबत असलेल्या दोन्ही महिलांची स्वतःची प्रत्येकी २ मुले असे एकूण ४ मुले (अनुक्रमे वय ९ वर्षे, ६ वर्षे, १ वर्षे, १ महिना) हे सुध्दा त्यांच्यासोबतच असल्याचे समजले.
७ बालक, २ महिला होत्या बेपत्ता
याबाबत गुहागर पोलिसांना माहिती प्राप्त होताच या घटनेत एकूण ७ बालक व २ महिला बेपत्ता असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली व चिपळूनचे उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या सुचनेप्रमाणे शोध घेण्यासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व ८ अमंलदार यांची ४ पथके तयार केली. घटनेच्या गांभीर्याप्रमाणे क्षणाचा विलंब न करता सविस्तर तपास केला गेला.
या महिला सर्व बालकासहीत मुबंईच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने त्या प्रमाणे वेळ न घालवता पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या पथकाला तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. इतर पथकाने केलेल्या तपासामध्ये या महिला व बालक हे मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. घटनाक्रम व वेळेची सांगड घालत गुहागर पोलीसांनी दोन्ही महिला व बालक यांना दादर येथून सुखरुपरित्या ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हेड कॉन्टेबल हनुमंत नलावडे, पोलीस नाईक राजेश धनावडे, वैभव ओहोळ, टॅबचे रमझ शेख यांच्या पथकाने केले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते हे करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times