म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची मते फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवला असून या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या अहवालात पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या आमदारांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची मते फुटली होती. त्याशिवाय विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान जवळपास काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित राहिले होते. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या केलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून कोणताही विरोध करण्यात न आल्याने काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यामुळे अनेकांनी याविरोधात थेट दिल्ली दरबारी तक्रार केली होती. परिणामी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्यावर जबाबदारी सोपवित या सर्व प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मोहन प्रकाश यांनी हा अहवाल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

घर घर तिरंगा: सरकारने पाठवले ५१ हजार ध्वज, पण हे काय?… खराब स्थिती पाहून बसला धक्का!

या अहवालात काही आमदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक पक्षादेश झुगारून मतदान केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आमदारांवर काय कारवाई करण्यात येते, याकडे महाराष्ट्र काँग्रेससह इतर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील एक आमदार, मराठवाड्यातील दोन ते तीन आमदार आणि मुंबईतील दोन आमदारांचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here