पुणे : आरोग्य विभाग, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणांचा समांतर तपास आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) केला जाणार आहे. त्यासाठी ‘ईडी’ने तिन्ही विभागांच्या भरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मागविली आहेत.

आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गातील पदभरतीसाठी गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. परीक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती. या प्रकाराला वाचा फुटल्यावर पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने या गैरव्यवहाराचा कसून तपास केला. त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि ‘म्हाडा’च्या पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेतही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांप्रमाणेच राज्यातील सर्वांत मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा तपास आता ‘ईडी’कडून केला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याला आता दुजोरा मिळाला आहे. ‘ईडी’कडून पाच लाखांच्या पुढील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो. या तिन्ही पेपरफुटी प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ‘ईडी’च्या पथकाने या तिन्ही गैरव्यवहार प्रकरणांशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवून घेतली असून, त्याचा समांतर तपास सुरू केला जाणार आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

घर घर तिरंगा: सरकारने पाठवले ५१ हजार ध्वज, पण हे काय?… खराब स्थिती पाहून बसला धक्का!

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्या पथकाने या तिन्ही गैरव्यवहार प्रकरणांचा कसून तपास केला. त्यामध्ये आरोग्य, शिक्षणासह विविध विभागांतील उच्चपदस्थ अधिकारी, परीक्षा आयोजनाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, एजंट, क्लासचालक आदी बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या घरझडतीतून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.

बड्या धेंडांचा समावेश

पुण्यासह राज्यभरात पोलिसांच्या पथकांची कारवाई सुरू होती. या तिन्ही प्रकरणांचा सविस्तर तपास केल्यावर पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी आणि परीक्षा आयोजनाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या वरिष्ठांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात या तिन्ही परीक्षांचे पेपर फोडून, परीक्षेच्या निकालांमध्ये फेरफार करून उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here