गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या आढळून आली असून या वाढत्या रुग्णसंख्येची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जात आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात २० जिल्ह्यांमध्ये करोना चाचण्यांची संख्या कमी नोंदविण्यात आली असून याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याचे कान टोचले आहेत. या २० जिल्ह्यांमध्ये तातडीने करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून केली आहे. त्याचबरोबर येत्या काळात महाराष्ट्रात अनेक सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना पत्र लिहून राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरात दिवसाला सरासरी २ हजार १३५ रुग्णसंख्या आढळून येत असून ५ ऑगस्टला १ हजार ८६२ इतकी रुग्णसंख्या आढळून आली आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्येपैकी ९.७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्याने त्वरीत पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी अधोरेखित केले आहे.
या पत्रात त्यांनी राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये २८ जुलै ते ४ ऑगस्टच्या कालावधीत करोनाच्या चाचण्या कमी झाल्याचे लक्षात आणून देताना येथील चाचण्या त्वरीत वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. याच कालावधीत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचेही सांगितले आहे. पाच जिल्ह्यांमध्ये आठवडाभरात १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सूचना
– येत्या काळात सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने गर्दी आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती.
– ज्या जिल्ह्यात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहेत, त्याठिकाणी विशेष लक्ष द्या. त्याशिवाय त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबवा.
– केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेल्या उपाययोजना आणि नियमावलींचे पालन करा.
– रुग्णांमध्ये वेगळे लक्षणे आढळल्यास त्याचा योग्य तो अभ्यास करा. जिनोम सिक्वेन्सिंगवर भर द्या.
– जास्तीत जास्त लसीकरण होण्यावर भर द्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंचसूत्रीची अंमलबजावणी करा.
या २० जिल्ह्यांमध्ये चाचण्या घटल्या
नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, वाशिम, सांगली, उस्मानाबाद, बीड, जालना, गडचिरोली, सातारा, बुलडाणा, औरंगाबाद, भंडारा, अमरावती, मुंबई उपनगर, रायगड, पुणे आणि ठाणे.
या ठिकाणी रुग्णसंख्या वाढती
मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, भंडारदरा, लातूर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नंदुरबार.
या पाच जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अधिक
पुणे (१३.२८), नागपूर (१२.१८), गोदिंया (११.८७), सांगली (१०.४७), नांदेड (१०.०५).