म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई :

दुबई येथून नवी मुंबईत कंटेनरद्वारे ३६२ कोटींचे अमली पदार्थ आणले होते. हा कंटेनर सात महिने अफगाणिस्तानात असल्याचे तपासात आढळून आले आहे. येथेच या कंटेनरच्या दरवाजाच्या चौकटीत अमली पदार्थ लपवल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

या तस्करी प्रकरणात पंजाबमधील तीन आणि पाकिस्तानमधील एकाचा सहभाग असल्याचे आढळून आले असून पुढील तपास दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई पथकाकडे सोपवण्यात आला आहे. नवी मुंबई आणि पंजाब पोलिसांनी १३ जुलैला पनवेलमधील एका वेअरहाऊसमधील कंटेनरमध्ये दुबई येथून लपवून आणलेले ३६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले.

एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीनं चालकानं घेतला गळफास; डेपोमध्ये एकच खळबळ

हा कंटेनर दुबईतील एका कंपनीने एप्रिल २०२१मध्ये खरेदी केला होता. त्यानंतर तो दुसऱ्याच महिन्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंपनीला विकला. नोव्हेंबरपर्यंत तो अफगाणिस्तानमध्ये होता. नंतर पुन्हा दुबईच्या कंपनीला विकण्यात आला. या कंटेनरमध्ये मार्बल भरून तो जेएनपीटी बंदरमार्गे नवी मुंबईत पाठविण्यात अाला. पोलिसांनी या कंटेनर व कागदपत्रांची तपासणी केली असता, तो अफगाणिस्तानमध्ये जास्त काळ ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे याच काळात या कंटेनरच्या दाराच्या चौकटीचे सांधे उघडून, त्यात अमली पदार्थ भरून तो ‘जैसे थे’ करण्यात आल्याचा संशय आहे.

डिसेंबर २०२१मध्ये कंटेनर जेएनपीटी बंदरात पोहोचल्यानंतर त्याला घेण्यासाठी कोणीही न आल्याने तो वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आला. यात अमली पदार्थ लपविल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here