गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून हंगामास सुरुवात होते. तेव्हापासून दरवाढीला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात कर्नाटक, मध्य प्रदेशातून, तर आंध्र प्रदेश तेलंगणातून डिसेंबरमध्ये मिरची बाजारात येते. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सध्या मिरचीची ६० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे. एकूण मिरचीचे दर साधारणतः ४३ ते ५५ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत,’ अशी माहिती मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी दिली. सध्या मिरचीच्या उत्पादनात मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे तुलनेने उत्पादकांकडे आवश्यक साठा उपलब्ध नाही. मालाचा तुटवडा आणि वाढती रोगराई; तसेच मजुरांचा अभाव यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मिरचीचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता सोपान काची यांनी वर्तवली.
मसाले, मिरची पावडरही महाग महाराष्ट्रात पुण्यातून मसाले विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात मिरचीचा पुरवठा करण्यात येतो. पुण्यासह सातारा, सांगली, नगर, नागपूर, वाशी, नंदुरबार येथे मिरचीची खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणात होते. पुण्यातून कोकण, सातारा येथे माल पाठविला जातो. मिरचीची पावडर करण्यासाठी मोठी खरेदी होते. मिरची महागल्याने मिरची पावडर, मसाल्याचे दर आता वाढले आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणितही बिघडले आहे, असेही निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले.