Devendra Fadnavis about Kalyan Lok Sabha Constituency | श्रीकांत शिंदे २०१४ आणि २०१९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपकडून गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील १६ मतदारसंघांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचाही समावेश होता. पण आता ते आमच्यासोबत युतीमध्ये आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप या मतदारसंघाबाबत काय करणार?

हायलाइट्स:
- बारामतीमध्ये चांगली मतं मिळाली होती
- निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे
- त्या सप्टेंबर महिन्यात बारामतीमध्ये येतील
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना भाजपने लक्ष केंद्रित केलेल्या १६ लोकसभा मतदारसंघांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, हे खरं आहे, भाजपकडून गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील १६ मतदारसंघांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचाही समावेश होता. पण आता ते आमच्यासोबत युतीमध्ये आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचा पक्ष मजबूत केला तरी, शिवसेनेचे जे खासदार आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठीही आम्ही शक्ती खर्च करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचाही उल्लेख केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला बारामतीमध्ये चांगली मतं मिळाली होती. आम्ही तिकडे चांगली लढत दिली होती. भाजपने निश्चित केलेल्या १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय भाजपमधील नेते प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. त्या सप्टेंबर महिन्यात बारामतीमध्ये येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तुमच्या अपेक्षेपेक्षा आधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल: फडणवीस
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही भाष्य केले. तुम्ही बोलताय त्यापेक्षा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. सुप्रीम कोर्टाने कुठेही मंत्रिमंडळ विस्तार करु नका, असे सांगितलेले नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. पण आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू. अजित पवार हे आता विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमच्यावर टीका करणे कमप्राप्त आहे. राजकारणात हे असेच करावे लागते. पण अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ३० दिवस फक्त ५ मंत्रीच कारभार पाहत होते, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.