एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना सरकारी बैठकांसाठी दिल्लीला सतत जावे लागते. आज दिल्लीत निती आयोगाची बैठक होती. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस दिल्लीला गेले आहेत. मला आदित्य ठाकरे यांना नम्रपणे सांगायचे आहे की, महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे झाले, त्याकडेही कटाक्ष टाका. केवळ सरकारी बैठकांसाठी, कामासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर त्याच्यावर टीका करण्याचे कारण नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.
आपण महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दौरे करत आहात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी किती दौरे केले होते, याकडे प्रथम त्यांनी लक्ष द्यावे. आता सत्ता गेली, ५५ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकटवले आहेत, शिवसैनिक पक्ष सोडून जात आहेत, हे पाहिल्यानंत आदित्य ठाकरे महाराष्ट्रात दौरे करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने लोकांना तुमचं दर्शन घडत आहे. तुम्ही लोकांना भेटत आहात. मातोश्रीची दारं सामान्य माणसांसाठी उघडी झाली आहेत. यावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून लोक मुंबईत येत आहेत. शिंदे साहेब राज्यभरात सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे सोयीस्कररित्या मुख्यमंत्र्यांवर टीका करु नका, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.
शिंदे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, आमदारांच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत आहेत. शिंदे गटातील काही आमदार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याविषयी चर्चा करत आहेत. यावर फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोण काय बोललं यावर उत्तर देण्याइतका मी रिकामटेकडा नाही. राजकारणात कोण काय बोलतंय, याला महत्त्व नसतं. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याला महत्त्व असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.