कॉफी विथ करण या चॅट शोचा यंदा सातवा सीझन सुरू आहे. अनेक स्टार किड्सनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. पण बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत स्वत:ची ओळख मिळवलेले स्टार मात्र या शोमध्ये दिसत नाहीत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अनन्या पांड्ये, सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट्ट हे स्टार किड्स या शोमध्ये आले होते. असं असताना अनेक हिट चित्रपट देणारी तापसी पन्नू मात्र अद्यापही शोमध्ये दिसून आली नाही. यावर प्रश्न विचारला असताना बिनाधस्त तापसीनं बोल्ड उत्तर दिलं आहे.
तापसी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तुला अजूनही कॉफी विथ करणचं आमंत्रण का आलं नाही? असा प्रश्न विचाल्यानंचर तापसीनं हटके उत्तर दिलंय. माझी सेक्स लाइफ इतकीही इंटरेस्टिंग नाही, की मी त्या शोमध्ये जावं…असं तापसीनं म्हटलंय. तापसीच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
भूमिकांची निवड
तापसी म्हणाली, ‘मी माझ्या पद्धतीनं भूमिकांची निवड करते. मी कधीही माझ्या स्पर्धक अभिनेत्री काय करत आहेत, बॉलिवूडमध्ये सध्या काय ट्रेंड आहे या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मनात सतत असल्या विचारांना जागा देण्यापेक्षा तो वेळ मी माझ्यातल्या अभिनेत्रीला देते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या भूमिकांसाठी स्वतःला कसं कणखर बनवता येईल, हे मी पाहते. स्पर्धेपासून दूर राहणं आणि त्याविषयी चर्चा करणं मी टाळते. आपण बाहेर फेकले जाऊ किंवा इथल्या ट्रेंडशी सुसंगत राहणार नाही, असले विचार माझ्या मनात येत नाहीत. मी ज्या स्पर्धेत धावतेय तिथं मी एकटीच स्पर्धक आहे आणि माझी स्पर्धा स्वतःशी आहे, या विचारातून स्वतःचा आत्मविश्वास वाढवते. म्हणूनच आज मी इथं काम करू शकते आणि इथं काय चालतंय आणि काय नाही हा विचार मला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. मी स्वतःसमोर ठेवलेली ध्येय ही या इंडस्ट्रीतल्या ट्रेंडनुसार नाहीत.’ तापसी लवकरच अनुराग कश्यपचा ‘दोबारा’, अजय बहलचा ‘ब्लर’ ज्याच्या निर्मिती प्रक्रियेतही तिचा सहभाग आहे आणि ‘वो लडकी हैं कहां’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.