राज्यातली राजकीय परिस्थिती १८० अंशात बदलल्यानंतर कुणाचे मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले तर कुणाचे घट्ट असलेले बंध सैल झाले. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी गेल्या ३५ वर्षांपासूनची मैत्री संपुष्टात येऊन आली. त्यांनी सेनेच्या इतिहासातलं सर्वांत मोठं बंड घडवून आणत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हिसकावली. त्यांना या कामी देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची साथ दिली. प्रसंगी जास्तीचे आमदार असताना केंद्राच्या आदेशानंतर मुख्यमंत्रिपदाचा त्याग करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं. याआधीही शिंदे-फडणवीसांच्या मैत्रीची चर्चा अधूनमधून कायम होत आली. मात्र यावेळी केंद्रीय नेत्यांचा आदेश प्रमाण मानून आपल्या मित्रासाठी फडणवीसांनी सर्वोच्च त्याग करत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडली. इतकंच नव्हे तर शपथविधी झाल्यानंतर शिंदेबरोबर अनेक एकत्रित दौरेही केले. जिथे जाईल तिथे दोघेही सोबत जाऊ लागले. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या केमिस्ट्रीची वेळोवेळी चर्चाही झाली.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि त्यांचं बंड यशस्वी झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे-फडणवीसांच्या मैत्रीवर भाष्य करताना, ‘सत्ताबदलाच्या काळात’ दोघे मध्यरात्री एकत्र भेटून चर्चा करायचे. एवढंच नव्हे तर देवेंद्र वेष बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायचे, असं सांगून राजकीय स्फोट केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर बरीच आगपाखड केली. कधीकाळी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या मैत्रीचं नातं अभिमानाने सांगणाऱ्या अमृतांनी यावेळी मात्र एकनाथ शिंदे-फडणवीसांचं मैत्रीचं नातं छानपैकी अधोरेकित केलं. ते ही ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या निर्धारासह…!