राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी आहे. दोन्हींचा एकत्रित वाटा ४५.९७ टक्के आहे. विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भटकुली, पीएआर कॅपिटल वेंचर्स, कार्तिक वर्मा देखील यात प्रमोटर आहेत. झुनझुनवाला यांच्यानंतर विनय दुबे यांचा सर्वाधिक म्हणजेच १६.१३ टक्के वाटा आहे. ही कंपनी चालवण्याची जबाबदारी विनय दुबे यांच्यावर असून ते या कंपनीचे सीईओ आहेत.
कोणकोणत्या सेवा दिल्या जातील?
आकासा एअरलाईनने एकूण ७२ विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी १८ विमाने मार्च २०२३ पर्यंत येणार आहेत. यानंतर पुढील चार वर्षांमध्ये उर्वरित ५४ विमानांचा पुरवठा होईल. आकासा एअरमधील विमानांमध्ये एकाच वर्गाच्या सिट्स असतील. यामध्ये बिझनेस क्लासची व्यवस्था नसेल. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या ब्रॅंड नावाने आकासा एअर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, आकासा एअरची सेवा मेट्रो शहरांपासून टियर – २ आणि टियर – ३ शहरांसाठी असेल. ही एक बजेट एयरलाईन आहे. आकासा एअरच्या विमानांमध्ये अन्न गरम करण्यासाठी ओव्हनची सुविधा नसेल. प्रवाश्यांना पॅकिंग असलेले उपमा/नूडल्स/पोहे/बिर्यानी हे पदार्थ खाण्याआधी गरम पाण्यात ठेवावे लागतील.
भाडे किती असेल?
मुंबई-अहमदाबाद मार्गे बोईंग ७३७ मॅक्स विमानातून आकासा एयरची व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील. या विमान कंपनीने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील किमान एकमार्गी भाडे ३,९४८ रुपये इतके ठेवले आहे. याच मार्गे इतर विमान कंपन्यांचे भाडे ४,२६२ रुपये इतके आहे. २२ जुलैला या कंपनीने तिकीट विक्री सुरू केली होती. काही तासातच सर्व तिकिटे विकली गेली.
कोण आहे प्रतिस्पर्धी?
झुनझुनवाला यांच्या आकासा एअरचे मुख्य प्रतिस्पर्धी इंडिगो आणि टाटा समूहाचे एयरलायन्स हे असतील. एअर इंडियाच्या विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि टाटा समुहाची ८० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. विमान वाहतूक क्षेत्र हे अतिशय स्पर्धात्मक क्षेत्र आहे.
कोणती आव्हाने पेलायची आहेत?
विमान वाहतूक क्षेत्र किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे, यामध्ये तिकिटाच्या किमतीला खूप महत्त्व असते. त्यामुळे, या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी आकासा एअरला तिकिटाच्या किमतीवर भर द्यावा लागणार आहे. सध्या या क्षेत्रातील दिवस फार चांगले नसून सोबतच विमान इंधनाच्या दरांमध्ये देखील वाढ होत आहे. कंपन्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करत आहेत तर क्षमतेचे देखील आव्हान आहे. आकासा एअरचा कदाचित सर्वात मोठा फायदा म्हणजे ते नव्याने सुरू होत आहेत. या कंपनीवर कोणतही दायित्त्व नाहीये.