पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेनेतून दररोज कोणत्या ना कोणत्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी सुरुच आहे. हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्याच्या जागी नव्या पदाधिकाऱ्याची नेमणूक स्थानिक नेत्याच्या सहमतीने आणि ठाकरेंच्या मान्यतेने होते आहे. आज औरंगाबादच्या जिल्हाप्रमुख पदावर कुणाला नेमायचं, याची चर्चा सुरु असताना चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोराचं भांडणं झालं. किशनचंद तनवाणी यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. यावरुन खैरे-दानवे उद्धव ठाकरेंसमोरच एकमेकांना भिडले.
दोन्ही नेत्यांचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा ऐकून घेतलं. मात्र दोन्ही नेते आपापल्या म्हणण्यावर ठाम होते. दोघेही ऐकायला तयार नव्हते. दुसऱ्या खोलीत जावून तुम्ही मार्ग काढा आणि मला सांगा, असं उद्धव ठाकरेंनी खैरे-दानवेंना सांगितलं. त्यानंतर वाद सोडविण्यासाठी तनवाणी यांना जिल्हाप्रमुख पदाऐवजी महानगरप्रमुख हे पद देण्यात आलं.
दानवे-खैरे यांच्यातील मतभेद कायमच चर्चेत
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील मतभेद अनेक वेळा समोर आले आहेत. दोघेही एकमेकांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखले जातात. एवढंच नव्हे तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरे यांचं काम केलं नाही. त्यांनी विरोधी उमेदवाराला बळ दिलं, असा आरोप केला जातो. याच मुद्द्यावरुन दोन्ही नेते ऑफ कॅमेरा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.
औरंगाबादच्या ६ सेना आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली असली तरी दानवे-खैरे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. गेल्या तीन आठड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी खैरे-दानवेंनी औरंगाबाद शहरात हजारो शिवसैनिकांचा मोर्चाही काढला. यानिमित्ताने दानवे-खैरे यांच्यातील कटुता दूर झाली, अशी चर्चा असतानाच आज पुन्हा मातोश्रीमधील वादाने त्यांच्यातील विस्तव अजूनही पेटता असल्याचं सिद्ध झालं.