“शिवसेना पक्ष आज अडचणीत सापडला आहे. अनेक जणांना अनेक पदं देऊन सेनेच्या बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण आता वेळ आली आहे ती अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याची… म्हणूनच जिथे कमी तिथे आम्ही…. माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह मी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचं मोठं काम उभा करेन. असा विश्वास मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे”, असं शरद कोळी यांनी पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला माध्यमांना बोलताना सांगितलं.
शरद कोळी यांचं ‘धाडस’ संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात मोठं नेटवर्क आहे. संघटनेच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. ‘धाडस’च्या ५ हजार पेक्षा जास्त शाखा असल्याचा त्यांचा दावा आहे. याच ५ हजार शाखा पदाधिकाऱ्यांसहित आपण उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. त्यासाठी आज रात्री छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून 50 पेक्षा जास्त गाड्या मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती कोळी यांनी माध्यमांना दिली.
शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
शरद कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक असले तरी त्यांच्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या नावे दमदाटी, धमकावणे, खंडणी, तडीपार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दुसरीकडे काँग्रेसचे तत्कालीन ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांच्यासोबतही कोळी यांचा ओबीसी आंदोलनात सहभाग होता.
लक्ष्मण हाके यांचा सेना प्रवेश
मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण हाके यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना सेनेत प्रवेश दिला. लक्ष्मण हाके शिवसेनेत आल्यामुळे शिवसेनेला एक आक्रमक ओबीसी आणि धनगर चेहरा मिळाला आहे.
विशेष म्हणजे लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांच्या मनगटावर शिवबंधन
आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ, गेल्या पंधरा वर्षांपासून फुले-आंबेडकरी विचार वाडी-वस्ती-तांड्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या वक्त्या तसेच मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी मागील आठवड्यात मातोश्री येथे शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला सभा गाजवणाऱ्या आक्रमक नेत्या तसेच ठामपणे बाजू मांडणाऱ्या निडर नेत्या मिळाल्या आहेत.