या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील २० गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुद्धा सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, या घाटाचे काम करून त्यास सुस्थितीत आणल्यास व कोयना बॅकवॉटर परिसरात पूल बांधल्यास रत्नागिरी ते सातारा हे अंतर अतिशय जवळ येईल. असे झाल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी एक नवा पर्यायी सक्षम मार्ग अस्तित्वात येईल. योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्हयातील असल्याने व आमदार योगेश कदम हे त्यांच्यासमवेत असल्याने या कामाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील निळीक येथे घरावर दरड कोसळली
शनिवार दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील निळीक भुवडवाडी येथे एका घरावर दरड कोसळली. या घटनेमुळे घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनील सीताराम भुवड असे नुकसानग्रस्त झालेल्यांचे नाव आहे.
या घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही
निळीक भुवडवाडी येथे दरड कोसळली असल्याचे माहिती येथील सरपंच रेहमान महाडिक यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थीची पाहणी केली. या दुर्घटनेत सुनील भुवड यांच्या स्वयंपाक घराचे नुकसान झाले आहे.