ममता बॅनर्जींवर थेट निशाणा
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीए उमेदवाराला समर्थन न देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर शिवसेनेनं स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ‘महागाई भडकली असली तरी निमूट त्या आगीत होरपळून मरा. महागाईविरुद्ध बोंब माराल तर याद राखा, असंच केंद्र सरकारचे धोरण आहे. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीची गळचेपी आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली, पण इतर विरोधी पक्ष कोठे आहेत? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे एक रहस्यच आहे. दिल्लीत काँग्रेस रस्त्यावर उतरली असताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहुधा दिल्लीतच होत्या व त्यांच्या राज्याचा जीएसटी परतावा मिळावा म्हणून विनवणी करीत होत्या. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थातूरमातूर कारणावरून त्यांनी मतदान केले नाही, ही बाब आम्हाला गंभीर वाटते,’ अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.
‘विरोधकांची भूमिका संशयास्पद’
शिवसेनेनं खरंतर आजच्या सामना अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र इतर विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद वाटते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवरही निशाणा साधल्याचं दिसत आहे. ‘प. बंगालात ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या राजकीय कारवाया वाढल्या. त्याचा हा परिणाम नसावा, पण राहुल व सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ने घेरले आहे तरी महागाई-बेरोजगारीविरुद्ध ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. अशा वेळी सर्व मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधकांच्या बेकीतच भाजपचे बळ आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत निर्माण केली जाते. राहुल गांधी यांनी बेडरपणे सांगितले आहे की, मी तुमच्या ‘ईडी’ला घाबरत नाही. हवी ती कारवाई करा. महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यावर त्याच पद्धतीने सूडाची कारवाई होताच शिवसेनेनेही तीच आक्रमक भूमिका घेतली, पण विरोधी पक्षातील इतर पुढाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.