सिंधुदुर्ग: जिल्ह्यात पुन्हा एकदा साथीची दहशत वाढली आहे. जिल्ह्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे असे वाटत असतानाच आज एकाच दिवशी करोनाचे ८ नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या बहुतेक रुग्ण मुंबई-ठाणे परिसरातून आलेले असल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहावालांपैकी ८ जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ६ रुग्णांचा तर वैभववाडी व मालवण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. कणकवली येथील ४ रुग्णांनी येथून प्रवास केला आहे तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा मुंबईतील प्रभादेवी येथून आलेला आहे. या नवीन ८ रुग्णांमध्ये ४ महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवशी करोनाचे ८ नवीन रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता १६ झाली आहे. यातील ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्गात ३४ हजार चाकरमानी दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो लोक नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यासारख्या शहरांत वास्तव्याला आहेत. करोनासाठी रेड झोन ठरलेल्या या भागांतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कुटुंबकबिल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यात परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून विशेषतः मुंबई ठाण्यातून आलेल्यांची संख्या ३४ हजारहून अधिक आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने शाळांमध्ये या बहुतेकांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जे रुग्ण आढळत आहे ते बहुतेकजण जिल्ह्याबाहेरूनच आलेले असल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून अधिक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here