महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी आक्षेप नोंदवला होता. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग ते तिथून ‘सामना’साठी लेख कसे लिहू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अशाप्रकारे तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत हे काही स्वातंत्र्यसेनानी नाहीत, असेही देशपांडे यांनी म्हटले होते. त्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला होता. याची दखल घेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी संजय राऊत यांची चौकशी होऊ शकते. या चौकशीत संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.
एखादी व्यक्ती तुरुंगात असल्यास त्यांना अशाप्रकारे वृत्तपत्रांमध्ये लेख लिहता येत नाहीत. तसे करायचे झाल्यास न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालय अशी परवानगी देत नाही, तोपर्यंत असे लेख लिहण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आता ‘सामना’तील संजय राऊत यांचे लेखन थांबणार का, हे पाहावे लागेल.
संजय राऊत आणि ईडी अधिकाऱ्यामध्ये वाद
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयातून न्यायालयात नेले जात असताना त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याशी वाद घातला होता. संजय राऊत ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आले होते. संजय राऊत या सगळ्यांशी बोलत उभे राहिले होते. तेव्हा राऊत यांच्यासोबत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने त्यांना हटकले. तुम्ही अशाप्रकारे इतरांशी बोलू शकत नाही. तुम्ही ईडीच्या कोठडीत आहात, त्यामुळे ही गोष्ट योग्य नाही. आपल्याला कोर्टात निघायचे आहे, असे या अधिकाऱ्याने संजय राऊत यांना सांगितले. त्यामुळे संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला होता.