मुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत ७ जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना ४ ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशीराच पोहोचले. मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर १३ वर्षीय मुलीवर ५३ वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले.
पीडितेला तिच्या वडिलांनी हिंगणघाट येथील घरी आणल्यावर घर मालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. अशातच मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. तक्रारीनंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळवण्यात आले आहे.