सातारा : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच कोल्हापूर आणि सातारा जिल्हाचा दौरा केला. या दौऱ्यावेळी आमदार पवार यांनी सातारा येथे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी कोसळणाऱ्या पावसात उभे असणाऱ्या रोहित पवार यांचा एक फोटो आता व्हायरल झाला असून त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी सृमीस्थळावरील फोटो शेअर केले. यातील एका फोटोत रोहित पवार हे हातात छत्री असतानाही पावसात भिजत उभे असल्याचं दिसत आहे.

या फोटावरून पवार, पाऊस आणि सातारा हे समीकरण कायम असल्याचं निरीक्षण नेटिझन्सने नोंदवलं आहे. तर दुसरीकडे, याच फोटोवरून राजकीय विरोधकांकडून रोहित यांचं ट्रोलिंगही करण्यात येत आहे. ‘एवढ्या पावसात भिजण्यापेक्षा छत्री उघडली असती तरी चालले असते…,’ अशा कमेंट्स काही युझर्सनी रोहित पवार यांच्या ट्वीटवर केल्या आहेत.

rohit pawar troll

रोहित पवार

शरद पवारांची साताऱ्यातील ती ऐतिहासिक सभा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातून होणाऱ्या आऊटगोईंगमुळे राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्या स्थितीतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यावेळी साताऱ्यात शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक धो-धो पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. तेव्हा पवार यांनी भाषण न थांबवता कार्यकर्त्यांना संबोधित करणं सुरूच ठेवलं. या सभेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि याचा राष्ट्रवादीला निवडणुकीत फायदा झाल्याचं बोललं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here