Bihar Political Crisis: भाजपने तीन महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये ‘ऑपरेशन RCP’ सुरु केले होते. तीन महिन्यांपूर्वी JDU पक्षातील एका आमदाराला भाजप नेत्याचा फोन आला. तेव्हा भाजपच्या (BJP) नेत्याने संबंधित आमदाराची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. त्यानंतर भाजपच्या नेत्याने जदयूच्या (JDU) आमदाराला विचारले की, आरसीपी सिंह यांना तुमच्या पक्षातील ३२ आमदारांचा पाठिंबा आहे का?

हायलाइट्स:
- या फोन कॉलबद्दल कळाल्यानंतर जदयूच्या गोटात एकच खळबळ उडाली
- ‘जदयू’तील गुप्तचरांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली
- नितीश कुमार यांच्यासमोर धक्कादायक माहिती आली
‘नवभारत टाईम्स’च्या माहितीनुसार, भाजपने तीन महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये ‘ऑपरेशन RCP’ सुरु केले होते. तीन महिन्यांपूर्वी JDU पक्षातील एका आमदाराला भाजप नेत्याचा फोन आला. तेव्हा भाजपच्या नेत्याने संबंधित आमदाराची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. त्यानंतर भाजपच्या नेत्याने जदयूच्या आमदाराला विचारले की, आरसीपी सिंह यांना तुमच्या पक्षातील ३२ आमदारांचा पाठिंबा आहे का? त्यावर जदयूच्या नेत्याने हा दावा फेटाळून लावला. असं होऊच शकत नाही, नितीश कुमार यांच्याच पाठिशी संपूर्ण पक्ष उभा आहे, असे जदयूच्या आमदाराने संबंधित भाजप नेत्याला सांगितले. त्यानंतर फोनवरील हे संभाषण संपले.
या फोन कॉलबद्दल कळाल्यानंतर जदयूच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यानंतर ‘जदयू’तील गुप्तचरांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावत याविषयी अधिक माहिती जमवायला सुरुवात केली. तेव्हा नितीश कुमार यांच्यासमोर धक्कादायक माहिती आली. आरपीसी सिंह खरोखरच जदयूत फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आरसीपी सिंह यांच्या बोलवता धनी वेगळा आहे, हे नितीश यांच्या लक्षात आले. त्यानंतर आरसीपी सिंह यांचे पंख पद्धतशीरपणे छाटण्यात आले. आरसीपी सिंह यांनी जदयूकडून पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आरसीपी सिंह यांना सभागृहाचा सदस्य नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नाराज झालेल्या आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम ठोकला होता.
नितीश कुमारांनी काळाची पावलं ओळखली
बिहारच्या राजकारणात बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे नेते म्हणून रामविलास पासवान यांची ख्याती होती. पण त्याचवेळी नितीश कुमार हेदेखील राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक राजकारणाची इत्यंभूत माहिती असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणातील छुप्या वाऱ्यांचा योग्य अंदाज घेतला. आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जदयूत फूट पाडली जाणार, हे कळाल्यानंतर नितीश कुमार यांनी धीर अजिबात सोडला नाही. आरसीपी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली जदयूतील ३२ आमदार फोडण्याचा प्लॅन होता. त्यामुळे नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांचे पंख पद्धतशीरपणे कापले. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यास नकार देण्यात आला. पाटणा येथील त्यांचा सरकारी बंगला काढून घेण्यात आला. तसेच त्यांच्या संपत्तीचा तपशील ‘जदयू’कडून जाहीर करण्यात आला. यामुळे संभाव्य बंडातील हुकमी एक्का ठरू शकणाऱ्या आरसीपी सिंह यांची चांगलीच कोंडी झाली.
आता पुढे काय घडणार?
जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर लढण्याचे संकेत दिले होते. या सगळ्या घडामोडींनंतर उद्या म्हणजे ९ ऑगस्टला जदयूच्या खासदार आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यावेळी नितीश कुमार यांच्याकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.