अहमदनगर : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. यासाठी देशभर मोठी तयारी केली जात असून भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून राष्ट्रध्वज कसा फडकवायचा यासंदर्भात एक चित्रफित प्रसारित केली आहे. मात्र त्यामध्ये आदर्श ध्वजसंहितेचे उल्लंघन झालं असल्याचं सांगत याकडे नगरमधील प्राध्यापक सतीश शिर्के यांनी लक्ष वेधलं आहे.

प्रा. शिर्के यांनी सांगितलं की, या चित्रफितीमध्ये एका ठिकाणी ध्वज पताकाप्रमाणे आडवा फडकवला आहे. ध्वज फडकवताना केशरी रंग नेहमी वरच्या बाजूला असावा, या नियमाचे उल्लंघन झालं आहे. दुसऱ्या ठिकाणी ध्वज दरवाजावर तोरणासारखा लावला आहे. एका ठिकाणी घरावर किंवा अंगणात फडकवण्याऐवजी तो घराच्या संरक्षक भिंतीवर फडकवल्याचं दाखवलं आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारी यंत्रणेकडूनच अशा पद्धतीने चुकीची माहिती दिली जात असल्यास जनतेत संभ्रम निर्माण होतो. सध्या २५ सेकंदाची ही चित्रफित सर्व सोशल मीडियावर फिरत आहे. ती सरकारने त्वरीत हटवून योग्य ती चित्रफित तयार करून प्रसारित केली पाहिजे, असं शिर्के यांनी म्हटलं आहे.

पन्हाळगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

केंद्र सरकारला पाठवलं पत्र

लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सरकारी स्तरावर जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च केला जात आहे. परंतु भावनेच्या भरात ध्वजसंहितेचे पालन होणे आवश्यक आहे. या अभियानात ध्वजाचा कोणत्याही परिस्थितीत अवमान होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यावी, असं आवाहनही शिर्के यांनी केलं आहे. यासंबंधी त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here