राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचं दिसत आहे. कारण विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे.
राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल ३० दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची दाट शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.
विधिमंडळ परिसरातील पोलीस बंदोबस्त अचानक वाढवण्यात आला आहे. या सगळ्या घटना पाहता मंगळवारी सकाळी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, नंदनवन बंगल्यावरील बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाऊ शकतात. त्यावेळी हे दोघेजण राज्यपालांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी सांगतील, अशी माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ‘राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तुम्ही जो विचार करत आहात, त्यापेक्षा लवकर होईल. सर्वोच्च न्यायालयाने विस्तार करू नका, असे सांगितलेलं नाही. त्यामुळे न्यायालयातील सुनावणीसाठी विस्तार रखडलेला नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत स्पष्ट केलं आहे.