एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिळखिळं केल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आणि हाती शिवबंधन बांधून ठाकरेंना साथ देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आज शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवासेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला खुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी जोरदार भाषण ठोकलं.
माझ्या अंगात ताप आहे. सर्दी झालेली आहे. बरं वाटत नाहीये. तुम्हाला त्रास नको म्हणून मी मास्क लावून बोलतोय. सांभाळून घ्या…, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुढे एक-एक करुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आसूड ओढले. “राज्यात २ लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जातीये, कधी माईक खेचली जातीये, कधी हवेत विमान थांबवलं जातंय. हे सगळं नाटक सुरु असताना तरुणांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हे सरकार नक्की कुणाचं आहे? असा प्रश्न तरुणांनी विचारण्याची गरज निर्माण झालं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आपले तात्पुरते मुख्यमंत्री… होय ते तात्पुरते मुख्यमंत्रीच आहेत.. कारण हे सरकार लवकरच पडणार आहे”, असा पुनरुच्चार करताना, “मुख्यमंत्री दिल्लीतून कधीकधी महाराष्ट्रात येतायत. माझा एखादा दौरा झाला की हे त्या मतदारसंघात जातात, फोटो काढतात आणि परत येतात”, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिदेंवर निशाणा साधला.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “अगोदर या राज्यात चर्चा कशाची असायची तर आरोग्य, शिक्षण, औद्योगिकरण, रोजगार वगैरे…. पण आत्ताच्या काळात घाणेरड्या राजकारणावर चर्चा होतीये, हे लोकांना मान्य नाही. आपण ही लढाई जिंकणार हे निश्चित आहे, फक्त खांद्याला खांदा लावून लढुयात. ही लढाई फक्त शिवसेनेची, महाराष्ट्राची नाही. ही कायद्याची लढाई देशभरातली आहे, लोकशाही राहणार की नाही, याची आहे. जो काही निर्णय येणार आहे, तो देशाला लागू असणार आहे, याचे संदर्भ पुढच्या २०-३० वर्षात लागू होतील. स्थिरता की अस्थिरता असा हा प्रश्न आहे, कोर्टाच्या निर्णयाकडे आपलं लक्ष आहे. सत्याच्या बाजूने आपल्याला लढायचं आहे, ही लढाई जोमात लढूयात”