या प्रकरणी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दरगड हॉस्पिटलच्या संचालिका असलेल्या महिला डॉक्टरविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना तपास अधिकारी सदर बाजार ठाण्याचे उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी सांगितले, की विकास सुभाष लिधोरिया (२८, रागजान नगर, देऊळगाव राजा) यांनी पत्नी नेहा ( वय २६) यांना प्रथम प्रसूतीकरीता जालना शहरातील दरगड हॉस्पिपटलमध्ये दाखल केले होते. दि.१३ एप्रिल रोजी नेहा यांची प्रसूती झाली. त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, प्रसूतीनंतर नेहा यांना रक्ताची आवश्यकता भासू शकते याची कल्पना रुग्णालयाच्या संचालिका असलेल्या महिला डॉक्टरांना होती.
एवढं असताना देखील डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष केले. नातेवाइकांनाही याबाबत पूर्वकल्पना दिली नाही. प्रसूती झालेल्या नेहा यांना रक्तस्राव होऊ लागला. रक्तस्राव थांबविण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता डॉक्टर महिला रुग्णास अप्रशिक्षित असलेल्या नर्सच्या जबाबदारीवर सोडून चक्क मॉर्निंग वॉकला निघून गेल्या. योग्य उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्रावामुळे नेहा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तपासात पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील तज्ज्ञ समितीचा अहवाल मागितला होता. समितीने प्रसूती पश्चात अतिरक्तस्राव झाल्याने योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दरगड हॉस्पिटलच्या संचालक असलेल्या महिला डॉक्टर विरुध्द कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक चाटे अधिक तपास करत आहेत.