विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते मिळावं यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे इच्छुक होत्या. अंबादास दानवे यांचा आक्रमक स्वभाव आणि फर्डी भाषणकला तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे. दुसरीकडे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. तसेच दानवेंना विरोधी पक्षनेते पद देऊन उद्धव ठाकरेंनी ‘संबंधितांना’ योग्य मेसेज दिल्याचीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंचं सभापतींना पत्र
शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस करत आहे.
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी जबाबदारी आता दानवेंवर!
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. हे काम अंबादास दानवे नेटाने करु शकतील. अंबादास दानवे यांची आक्रमक अभ्यासू नेता म्हणून ओळख आहे. संसदीय आयुधांचा योग्य वापर करुन ते सरकारला अडचणीत आणू शकतात. मराठवाड्यातील नव्या दमाच्या नेत्याला संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी डाव टाकला आहे.
सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना!
विधानपरिषदेतील शिवसेना आमदारांची ९ जुलै रोजी मातोश्रीवर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधानपरिषदेचे सर्वाधिक १३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यात आला.
अंबादास दानवे कोण आहेत??
शिवसेनेचे विधान परिषद सदस्य
मराठवाड्यातील शिवसेनेचं आक्रमक नेतृत्व
कट्टर शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे विश्वासू साथी
मराठवाड्यातून ६ आमदार शिंदेसोबत, दानवे मात्र खांद्याला खांदा लावून ठाकरेंसोबत