चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फोन गेल्याचं समजतं. त्यामुळे राज्य भाजपमधील ४ मोठी नावं शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दिसणार हे स्पष्ट झालं आहे. या चार नेत्यांसोबतच मंगलप्रभात लोढा यांचं नावदेखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठं नाव आहे. देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर अशी त्यांची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल ७० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून विजयी झाले. निवडणूक शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली. लोढा यांच्याकडे ४४१ कोटींची संपत्ती आहे. ६६ वर्षांचे लोढा मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मूळचे राजस्थानच्या जोधपूरचे असलेले लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले. त्यांनी लोढा समूहाची स्थापना केली. रिअल इस्टेट क्षेत्रात या समूहाचा खूप मोठा दबदबा आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. मुंबई भाजपचं अध्यक्षपद लोढा यांच्याकडे आहे. मारवाडी समाजातील भाजपचा प्रमुख चेहरा अशी लोढा यांची ओळख आहे. १९९५ पासून सलग सहावेळा लोढा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र त्यांना एकदाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही.