नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना सडेतोड, प्रसंगी खालच्या भाषेचा वापर करुन टीका करणारे नेते म्हणून ओळखलं जातं. त्या तुलनेत नितेश राणेंची संयमी नेतृत्व म्हणून ओळख होती. पण गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आपलं आक्रमक रुप दाखवून दिलं होतं. महाविकास आघाडी सत्तेत असताना नितेश राणे यांनी कायम शिवसेना-उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत या ना त्या मुद्द्यांवरुन ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. कोव्हिडच्या काळातील सरकारचं काम, मविआ काळातील भ्रष्टाचार, मविआ नेत्यांची जेलवारी तसेच सुशांत सिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करुन राणेंनी ठाकरेंवर अनेक बाण सोडले. हे बाण ठाकरेंच्या जिव्हारी लागले. उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा अनेक वेळा बोलून दाखवला. एकंदरित ठाकरेंवर टीका करायची जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा भाजपमधून नितेश राणे हेच नाव पुढे आलं. त्यामुळे जे फडणवीसांना बोलता येत नाही, ते राणे-पडळकर ही जोडगोळी बोलते, अशी टीकाही विरोधकांनी केली.
मुंबई महापालिकेची निवडणूक ४ महिन्यांवर येऊन ठेपलीये. शिवसेनेसाठी BMC निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. ज्या मुंबईत सेनेचा जन्म झाला, त्याच मुंबई-ठाण्यात एकनाथ शिंदेंनी बंड करुन ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं केलंय. तेव्हा मुंबईतून शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी आणि ठाकरेंसमोर आव्हान उभं करण्यासाठी फडणवीस राणेंना पुढे करुन डाव टाकू शकतात. त्याचसाठी राणेंना ताकद म्हणून नितेश यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण १८ जणांचा शपथविधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून नऊ, तर शिवसेनेकडून नऊ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याची माहिती आहे. मंत्रिपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी काही संभाव्य नावं समोर येत आहेत. भाजपकडून चौघा दिग्गजांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन, दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या चौघांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे. पाटील, महाजन, मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या आतील वर्तुळातील नेते मानले जातात. त्यामुळे या तिघांना मंत्रिपद मिळणं साहजिकच होतं. याशिवाय, आशिष शेलार यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची तूर्तास मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. तर विधानपरिषदेवरील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेसुद्धा पहिल्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता कमी मानली जाते.