राज्य भाजपमधील महत्त्वाचा चेहरा अशी शेलार यांची ओळख आहे. मराठा नेता, टास्कमास्टर, सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध या शेलारांच्या जमेच्या बाजू आहेत. फडणवीस सरकारमध्ये शेलारांकडे ५ महिने शिक्षण मंत्रीपद होतं. विनोद तावडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेलार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.
भाजपमधील महत्त्वाचा मराठा चेहरा म्हणून आशिष शेलार ओळखले जातात. फडणवीसांच्या तोडीचे नेते अशी त्यांची राजकीय वर्तुळातील ओळख आहे. त्यामुळेच त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असताना भाजपनं एकनाथ शिंदेंच्या रुपात मराठा मुख्यमंत्री दिला. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही शेलारांच्या रुपात मराठा चेहरा दिला जाऊ शकतो. आक्रमक नेते अशी शेलारांची ओळख आहे.
आशिष शेलार विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २०१२ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढवली. शिवसेनेला बालेकिल्ला असल्यानं भाजपसमोर आव्हान होतं. शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपनं ३१ वरून ८२ वर उडी मारली. शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपनं मिळवलेल्या यशात शेलारांचा सिंहाचा वाटा होता. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात शेलारांची भूमिका महत्त्वाची असू शकते.