राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आमदार बंधूविरोधात पॅनेल करून निवडणूक जिंकली. सोसायटीच्या निवडणुकीत देखील आमदार बंधूला जोरदार टक्कर देऊन घाम फोडला. बंधूंविरोधात आता जमत नसल्याने अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भारत कोकाटे हे सध्या सोमठाणेचे सरपंच आहेत. त्यांच्याबरोबर सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंनी सदस्य नोंदणीच्या केलेल्या आवाहनाला शिवसैनिक तुफान प्रतिसाद देत आहेत. सदस्य नोंदणीला प्रतिसाद तर वाढतोय तसेच आमदार-खासदारांच्या बंडानंतरही पक्षामध्ये होत असलेलं इनकमिंग पाहता शिवसेनेची ताकदही वाढतेय आणि उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही… कारण आज कोकाटेंच्या शिवसेना एन्ट्रीने नाशिकमध्ये आता सेनेची ताकद वाढल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकावर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ते ही मर्दासारखी…. असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदांवर टीका केली. मला नेत्यांचे फक्त प्रवेश नको आहेत, फोटो नको आहे, गर्दी नको आहे. मला पक्ष सदस्यांच्या नोंदणीची एवढी प्रतिज्ञापत्रं हवीत की भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.