शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तरावरून आज मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या उंचावल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रखडलेले रस्ते व रस्त्यांची दुरावस्था याबाबत पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलं आहे.
कल्याण-डोंबिवली खड्ड्यावर काय बोलले मनसे आमदार?
एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाटले, उलटे लावून झाले, तरी कामे अजून सुरू झाली नाहीत, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतो आहोत. या मागची भावना कोणावर टीका करण्याची नाही, तर या कामाकडे लक्ष द्यावे अशी आहे. जिथे कामे झालेली नसतील तिथे आम्ही बोलणारच. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.
ठाण्याचे मुख्यमंत्री असताना खड्डे भरले जावेत ही अपेक्षा!
पाऊस जोरात होता, त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र तसे कुठे डोंबिवली कल्याणमध्ये कुठेही झालेले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जात आहेत. इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यात मंत्रिमंडळ नाही, ४० दिवस झाले दाद मागायची कुठे?, ठाण्याचे मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत, अशी अपेक्षा आहे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.