भारतीय जनता पक्षाचे परप्रकाशित अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी घराणेशाही जपणाऱ्या प्रादेशिक पक्षांवर जबरदस्त हल्लाबोल केल्यानंतर पाटण्यात राजकीय घडामोडींना वेग यावा, हा योगायोग नाही. नड्डा यांनी केवळ घराणेशाही असणाऱ्या पक्षांवर हल्ला चढविताना, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा खास उल्लेख केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष प्रादेशिक असला, तरी तो काही अजून तरी घराणेशाही असणारा नाही; मात्र भाजपचा रोख सगळ्यांच प्रादेशिक पक्षांवर दिसतो. भाजप या सगळ्या प्रादेशिक पक्षांना एक दिवस धडा शिकविणार आहे, हा विडाच पक्षाच्या अध्यक्षांनी उचलला आहे. तो आज ‘सुपात’ असणाऱ्याही साऱ्यांना अर्थातच लागू होतो. महाराष्ट्रातील नाटकाचा दुसरा अंक आज शिंदे मंत्रीमंडळाच्या शपथविधीने सुरू होत असताना, भाजपश्रेष्ठींनी दुसऱ्या महत्त्वाच्या राज्याला हात घातलेला दिसतो. बिहारची गेली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा नितीश यांच्या संयुक्त जनता दलाला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या; मात्र तेव्हा ‘आधी दिलेल्या शब्दाला जागून’ भाजपने मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांनाच दिले. नितीश यांचे जुने मित्र आणि भाजपचे विधीमंडळ गटनेते सुशीलकुमार मोदी यांना मात्र भाजपने पुन्हा उपमुख्यमंत्री केले नाही. हा नितीश यांना पहिला सूचक इशारा होता. पूर्वी शिवसेना आणि भाजप यांची युती कायम ठेवण्यात भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना अनेक कारणांनी रस असे, असे म्हणतात. बिहारमध्ये नितीश व सुशीलकुमार मोदी यांची जोडी पुरती जमली होती. ती जोडी मुद्दामच फोडण्यात आली. तेव्हाच, अमित शहा यांनी आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अनेकांना राज्यात मंत्री केले, असे आता नितीश म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी नितीश यांनी रामचंद्र प्रतापसिंह यांना जनता दलाची राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने, त्यांना मोदी मंत्रीमंडळातून जावे लागले. हे आरसीपी सिंह माजी आयएएस अधिकारी आहेत. ते मंत्री झाले, तेव्हा नितीश यांच्या इच्छेने झाले की शहांच्या इच्छेने, हा प्रश्न आजही चर्चेत असतो. थोडक्यात, नितीश यांच्याभोवती भाजपने केलेली पेरणी आता उगवून येते का आणि उद्या संयुक्त जनता दलात फूट पाडण्यात भाजपला यश येते का, यावर बिहारच्या राजकारणाची दिशा ठरेल, असे दिसते.

आज बिहारमध्ये लालूप्रसाद यांचा राजद आणि नितीश यांचा जनता दल यांची ताकद दुर्लक्ष करण्याजोगी नाही; किंबहुना लालूंच्या राजदने विधानसभा निवडणुकीत नितीश व भाजपला जोरदार टक्कर दिली. तेव्हा, नितीश पुन्हा आपला पक्ष घेऊन राजदकडे जातात का आणि मुख्य म्हणजे त्यांचा हा बेत या वेळी यशस्वी होतो का, हाही प्रश्न आहे. बिहार राज्यातून झारखंड वेगळा झाल्यानंतर तेथे लोकसभेच्या ४० जागा आहेत. दिल्लीतील सरकारसाठी हा आकडा छोटा नाही. अशा वेळी, नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडली, तर सन २०२४मधील लोकसभा निवडणुकीचा बिहारी खेळ कसा होईल, हे सांगता येत नाही. नितीश यांनी राज्यसभेची जागा नाकारल्यानंतर आरसीपी सिंह यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले. हा राजीनामा देताना त्यांनी ‘नितीश सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे,’ असा आरोप केला आहे. निष्कलंक सार्वजनिक चारित्र्य ही नितीश यांची जमेची बाजू आहे. आता सरकारवर होणारे आरोप म्हणजे नितीश यांचे सरकार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे का, अशीही शंका येऊ शकते. गेल्या विधानसभेत युती असूनही भाजप हा मोठा पक्ष झाला, तेव्हाच नितीश यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असणार. आपले अनेक उमेदवार कसे पडले, याचे गणितही त्यांनी मांडले असणार; मात्र तेव्हा त्यांना दुसरा राजकीय पर्यायही नव्हता. आज नितीश यांनी चालविलेल्या हालचाली म्हणजे संभाव्य राष्ट्रीय नेतृत्वासाठी टाकलेले पाऊल नसून, आपला पक्ष वाचविण्याची धडपड आहे. परवा नितीशकुमार यांनी राजधानीत झालेली नीती आयोगाची बैठक चुकविली. या गैरहजेरीची देशभर चर्चा झाली; पण केंद्र सरकारने बोलविलेल्या बैठकांना दांडी मारण्याची नितीश यांची ही पहिली वेळ नव्हती. आजवर पंतप्रधान मोदी आणि विशेषकरून गृहमंत्री अमित शहा यांनी बोलविलेल्या अनेक बैठका नितीश यांनी चुकविल्या आहेत. शहा यांना दिल्लीत बसून बिहारचे राज्य चालविण्यात रस आहे, हा नितीश यांचा जुना संशय आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारींची आता दखल घेतली जात नाही, असा नड्डा यांच्या अलीकडील तिखट विधानांचा अर्थ आहे. नितीश यांनी जसे सर्व आमदार व खासदारांना पाटण्यात बोलावले आहे; तसेच राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही आपल्या आमदारांना पाटण्यात बोलावले आहे. नितीश, तेजस्वी आणि काँग्रेस यांचे संख्याबळ नवे सरकार येण्यासाठी पुरेसे आहे; मात्र दिल्लीश्वरांनी सुरू केलेला बिहारी ‘खेला होबे’ अनेक राजकीय धक्केही देऊ शकतो. महाराष्ट्राचे उदाहरण फार जुने झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here