मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा राजधानी मुंबईलाही बसला आहे. शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मात्र लोकल सेवा अजूनही विनाव्यत्यय सुरू असल्याची माहिती आहे.
राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा इशारा
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.