Maharashtra Cabinet expansion | एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर मंगळवारी पहाटे ३.५० वाजेपर्यंत गुप्त खलबतं सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नंदनवन बंगल्यावरील या बैठकीला शिंदे गटाचे १४ आमदार उपस्थित होते. यामध्ये दीपक केसरकर, दादा भुसे, महेश शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, उदय सामंत आणि अब्दुल सत्तार या नेत्यांचा समावेश होता.

हायलाइट्स:
- अब्दुल सत्तार यांची आजची संधी हुकण्याची शक्यता
- उर्वरित बंडखोर आमदार नाराज होण्याची भीती
- नंदनवन बंगल्यावर मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत गुप्त खलबतं
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत गुप्त खलबतं सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे तीन वाजता एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावरून बंगल्यावर परतले. त्यानंतर या बैठीकाल सुरुवात झाली. नंदनवन बंगल्यावरील या बैठकीला शिंदे गटाचे १४ आमदार उपस्थित होते. यामध्ये दीपक केसरकर, दादा भुसे, महेश शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, उदय सामंत आणि अब्दुल सत्तार या नेत्यांचा समावेश होता. रात्री साडेतीन वाजेपर्यंत हे सर्व नेते चर्चा करत होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अब्दुल सत्तार यांना तुर्तास मंत्रिपदापासून दूर राहावे लागेल, असा संदेश देण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत कशाप्रकारे काढली असेल, याविषयीही अनेकांना उत्सुकता आहे.
पहाटे आटोपलेल्या या बैठकीनंतर आता शिंदे गटाचे आमदार मंगळवारी सकाळी ९.३० वाजता पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावर एकत्र येतील. मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम ११ वाजता आहे. त्यापूर्वीच्या या बैठकीत शिंदे गटातील मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर शिंदे गटात नाराजी उफाळून येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शिंदे-फडणवीस सरकारकडून आज मंत्रिमंडळ विस्तार करून अधिवेशन घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशन संपेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येऊ शकतो. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडू शकतो, असे सुत्रांकडून सांगितले जात आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन करून अजित पवार यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.