oath taking ceremony maharashtra live, मंत्रिमंडळ विस्तारात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट; अब्दुल सत्तार यांचं नाव निश्चित – maharashtra state cabinet expansion minister list in marathi abdul sattar’s inclusion in the cabinet is finally confirmed
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून काही मिनिटांतच भाजप आणि शिंदे गटाचे १८ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी नेत्यांकडून शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. त्यातच माजी राज्यमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र अखेर सत्तार यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला असल्याची माहिती समोर येत आहे. विधिमंडळात जिथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे तिथे सत्तार यांच्या नावानेही आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र असताना, बनावट प्रमाणपत्र वितरित झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या यादीत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली होती. परिषदेने ‘टीईटी’त गैरप्रकार केलेल्या ७,८८० उमेदवारांची यादी जाहीर केली. अपात्र घोषित करीत उमेदवारांना टीईटी २०१९मधील संपादणूक रद्द करून यापुढे होणाऱ्या परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले. यामध्ये ७,५०० उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असतानाही निकालात त्यांना पात्र करण्यात आले. तर २९३ उमेदवार असे आहेत जे अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परिषदेच्या विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या यादीत सत्तार यांच्या मुलींची नावे असल्याची चर्चा समोर आली. त्यामुळे खळबळ उडाली होती. शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंमध्ये खडाजंगी
अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
माझ्या दोन्ही मुलींनी ‘टीईटी’ दिली; परंतु त्या पात्र झाल्या नाहीत. तसे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे. अपात्रतेनंतर आम्ही त्यांच्यासाठी ‘टीईटी’च्या माध्यमातून प्रयत्न केला नाही. आमच्यावरील आरोप आम्हाला बदनाम करण्याचा प्रकार आहे. माझ्या मुली २०१७मध्येच संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आमची चूक असेल तर, कारवाई करा; परंतु चूक नसेल तर, बदनामी करू नये, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.