उदय सामंत हे सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पण रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री अनिल परब यांच्या अनुपस्थितीत उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दौरे करून हा जिल्हाही सांभाळला होता. त्यामुळे सामंत यांचा संपर्क या दोन्ही जिल्ह्यात ऊत्तम आहे. त्यांनी आठ वर्षांपूर्वी निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी दाखल केली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ त्यांनी एकहाती आपल्याकडे ठेवला आहे. सामंत यांच्यासाठी हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आजही सेफ मानला जातो. उदय सामंत ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये कोणती जबाबदारी दिली जाते याची उत्सुकता अनेकांना आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सामंत यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांच्याबरोबरच कोकणातून आमदार दीपक केसरकर व भाजपचे रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रवींद्र चव्हाण यांनाही भाजपच्या गोटातून संधी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बंडखोर तथा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांचे नाव अखेर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे असे समजते.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times