मुंबई : सत्ता स्थापन होऊन तब्बल एक महिन्यानंतर आज मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये अनेक माजी मंत्र्यांना पुन्हा मोठी संधी मिळाली असून यामध्ये भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे. शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा ते जबाबदारी पार पाडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रकांत पाटील हे नावच एक ब्रँड झाले आहे. २००४ साली म्हणजे केवळ १८ वर्षांपासून राजकारणात असलेले चंद्रकांत पाटील सध्याचे राजकारणातील ब्रँड कसे झाले? काय आहे त्यांचा एकूणच प्रवास? पाहुयात…

चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर हे जरी असले तरी त्यांचा जन्म हा मुंबईतील रे रोड येथील एका प्रभुदास चाळीमध्ये झाला. चंद्रकांत पाटील यांचे आई वडील दोघेही गिरणी कामगार, त्यामुळे त्यांची संपूर्ण जडणघडण आणि शिक्षण मुंबईमध्येच पार पडले. राजा शिवाजी विद्यालय या दादरमधील शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले तर सिद्धार्थ महाविद्यालयामधून त्यांनी बीकॉमपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतले. सध्या ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हापूरातील संभाजीनगर इथे ते आपल्या परिवारासोबत राहतात.

मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्याला झुकते माप; कोणत्या विभागातून कोणाला संधी? जाणून घ्या….
चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयीन काळापासूनच यशवंतराव केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. ऑगस्ट १९८० मध्ये जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर जळगाव मध्ये १९८३ पर्यंत संघटन बांधणी केली. यादरम्यान त्यांनी काश्मीर प्रश्नावर एक मोहीम हाती घेतली होती त्याची सुद्धा मोठी चर्चा झाली होती.

एप्रिल २००० ते २०१३ पर्यंत त्यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी होती. हे सर्व सुरू असतानाच चंद्रकांत पाटील हे राजकारणात आले आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. चंद्रकांत पाटील हे २००४ मध्ये राजकारणात सक्रिय झाले. राजकारणात सक्रिय होताच २००४ ते २००७ या कालावधीमध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशा दोन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाची झलक उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली.

भाजपमधील दिग्गजांना संधी, तर शिंदेंकडून ‘ठाकरे पॅटर्न’, पाहा ते १८ मंत्री
२०१९ पासून त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. दरम्यान, राजकारणात पक्षाच्या माध्यमातून या जबाबदाऱ्या तर मिळाल्याच पण त्यांना २००८ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिली आणि त्यामध्ये ते विजयी सुद्धा झाले. २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. फडणवीस यांचे सरकार आले आणि चंद्रकांत पाटील यांना सहकार, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, महसूल ही मोठी खाती मिळाली. याच काळात त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती.

याच दरम्यान पक्षाकडून २०१६ मध्ये विधानपरिषदेचा सभागृह नेता म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे कृषी व फलोत्पादन मंत्री पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली. त्यानंतर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना कोल्हापूरात भाजपसाठी मतदारसंघ नसल्याने पुण्यामध्ये जावे लागले. तेथील कोथरूड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामध्ये मोठ्या मतांनी ते विजयी झाले. मात्र, यावेळी शिवसेना-भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. यामुळे चंद्रकांत पाटील यांना विरोधात बसावं लागलं.

या दरम्यान ही त्यांनी दरवेळेस हे सरकार पडण्याची नवीन तारीख जाहीर करायचे. त्यामुळे त्यांना ज्योतिष आणि बरीच काही नावं ठेवण्यात आली. मात्र, आता शिंदे आणि भाजप सरकार आले आणि यात मंत्रिमंडळात सर्वप्रथम नाव चंद्रकांत पाटील यांचे आहे.

Bacchu Kadu: मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’, ‘मंत्रीपद आमचे हक्काचे आहे आणि ते आम्ही मिळवूच’

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here