मुंबई: ठाकरे सरकारमध्ये एका वादग्रस्त प्रकरणामुळे वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची दुसरी कारकीर्द प्रचंड अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी सकाळी संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारासाठी अंतिम झाल्यानंतरच प्रचंड टीकेची झोड उठली. संजय राठोड यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताच या टीकेचा जोर आणखीनच वाढला. शिंदे गट आणि भाजप सध्या एकत्र सरकारमध्ये आहेत. मात्र, राठोडांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच क्षणाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली.
संजय राठोड तिकडे शपथ घेत होते, इकडे चित्रा वाघ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती…!
राजभवनातील शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वप्रथम विरोधी पक्षनेते अजित पवार याठिकाणहून बाहेर पडले. तेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता, मंत्रिमंडळात काही नावं टाळली असती तर बरं झालं असतं, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. तर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यावरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. यावेळी पेडणेकर यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात संजय राठोडांच्या राजीनाम्याचा आग्रह धरणाऱ्या चित्रा वाघ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्य केले. त्या बाईने (चित्रा वाघ) एकाचं मंत्रिपद घालवलं, मुलीच्या खुनावरून किती रान पेटवलं होतं. ज्याचं मंत्रिपद घालवलं आता भाजप त्यालाच पुन्हा मांडीवर घेत आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? पण जनता हे सगळं बघत आहे, या सगळ्याचा हिशेब ठेवत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला झुकते माप; कोणत्या विभागातून कोणाला संधी?
भाजपची वॉशिंग पावडर चरित्रही साफ करते: यशोमती ठाकूर

मंत्रिमंडळ विस्तार झालाय पण आश्चर्य म्हणजे एकही महिला त्यात नाही. याचा विनोद होऊ शकतो अशी कृती तिथे केलेली आम्हाला दिसतेय. भाजपची जी वॉशिंग पावडर आहे ही फारच कपडे आणि चरित्र साफ करते. चित्रा ताई वाघ आता काय कमेंट करणार याची मी वाट बघतेय. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे व्हाईटवॉश केलेलं मंत्रिमंडळ आहे का. बघुयात काय होतंय, असे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. चित्रा वाघ यांनीही आक्रमक बाणा दाखवत संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाला तरी त्याच्याविरोधातला माझा लढा सुरुच राहणार असल्याचं सांगत त्यांच्याविरोधातला संघर्ष थांबणार नसल्याचा इरादा व्यक्त केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here